‘अवकाश पेलताना’ प्रकाशन समारंभ अतिशय नेटका व देखणा झाला होता. पुस्तक वाचून झाल्यावरच कळवू असा विचार केला. सर्व कथा छान उतरल्या आहेत.
विशेषतः ‘अवकाश पेलतांना’ आणि ‘स्व ‘ मी दोनदा वाचल्या.’अवकाश पेलताना ‘मधे मानसशास्त्राचा अभ्यास जाणवतो. ‘स्व’ सुद्धा चिंतन करायला लावते. त्यात पात्रांचे परस्पर संवाद छान लिहिलेत.त्यामुळे संवाद लेखनाचे कौशल्य जाणवते.
या कथांवर तू एकांकिका लिहू शकशील. ‘विसर्जन ‘ संवेदनाशील, हळव्या मनाला स्पर्श करणारी कथा आहे.
‘खुर्ची ‘यापूर्वी वाचली आहे.तर ‘हतबुद्ध ‘ ‘भवचक्र’ च्या विस्तारीत रूपात वाचली होती आणि आवडली होती. त्यावर मी अभिप्राय कळवला होता. तो पुन्हा खाली देत आहे.(एप्रिल २०२२).
लेखनातील सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल अभ्यास कौतुकास्पद.सकस लेखनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.उशीराबद्दल क्षमस्व.
– — श्री.शाम पठोडे
अंतर्नाद मासिक (अंक नोव्हेंबर २०२४) मधील डॉ. अनिल जोशी यांनी लिहिलेले बंध आणि इतर कथा या कथासंग्रहावरील परीक्षण
उमाकांत काशिनाथ घाटे यांचा ‘बंध आणि इतर कथा‘ हा कथासंग्रह मिहाना पब्लिकेशन्समार्फत नुकताच प्रसिद्ध झाला आहे. गेल्या अनेक वर्षांत प्रसिद्ध झालेल्या लेखकाच्या कथांपैकी २० निवडक कथांचा हा संग्रह आहे. लेखकाच्या कथा अंतर्नाद, माहेर, मेनका, किर्लोस्कर, किस्त्रीम, शब्दालय, शब्दगांधार यांसारख्या मातब्बर मासिकांमधून यापूर्वी प्रसिद्ध झाल्या आहेत. लेखकाचा हा पहिलाच कथासंग्रह. लेखकाने आपल्या मनोगतात सुप्रसिद्ध कथाकार व्यंकटेश माडगूळकरांचे एक वाक्य उद्धृत केले आहे, “कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते; तर कथा सोलो वाद्यांसारखी.” जीवनानुभवातील एखादी व्यक्ती किंवा प्रसंग निवडून एखादा पक्षी फळाशी झोंबावा तसे काहीसे कथालेखकाने करायचे असते असे घाटे यांचे म्हणणे आहे. घाटे यांना हे सोलो वाद्यवादन किंवा फळाशी झोंबी उत्तम जमली आहे असेच म्हणावे लागेल. सुप्रसिद्ध समीक्षक प्राध्यापक विजय तापस यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना हे या कथासंग्रहाचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. प्राध्यापक तापस यांनी भारतीय भाषापरंपरेतील कथा या वाङ्मय प्रकाराचा धावता आढावा घेतला आहे. ते लिहितात,
‘कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे; त्यातून कथा हा शब्द रूढ झाला आहे. भारतात कथा या साहित्यप्रकाराला फार मोठी परंपरा आहे. अगदी प्राचीन काळापासून भारतातल्या सर्व भाषांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कथा आणि कथा सांगण्याची परंपरा अस्तित्वात आहे. आज कथा सांगण्याच्या असंख्य पद्धती अस्तित्वात आहेत त्या त्याचमुळे! आजवर लाखो कथनकार आपल्याला कथा सांगत आहेत, आपलं रंजन करत आहेत.’
कथा परंपरेचा आढावा घेत तापस सरांनी उमाकांत घाटे यांच्या शैलीचेही परीक्षण केले आहे. ‘कथा म्हणजे एका कालबिंदूवर विशिष्ट स्थळी पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण,’ ही तापस सरांची कथेची अत्यंत सुटसुटीत व्याख्या. वरकरणी ही व्याख्या सोपी वाटली तरी त्यात कथा बसवणे किंवा बेतणे हे सोपे नाही. परंतु उमाकांत घाटे यांनी हे आव्हान स्वीकारले आहे व त्यात त्यांना यशही आले आहे. पात्रे उभी करणे, त्यांचे परस्पर संवाद आणि कथा क्रमाक्रमाने एका नाट्यमय बिंदूला घेऊन ती सोडणे ही कथालेखकाची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. प्रत्येक ठिकाणी कथा संपल्यानंतर लेखकाने उत्तर किंवा निष्कर्ष दिला आहे असे आढळत नाही. काही ठिकाणी हा निर्णय त्यांनी वाचकांवर सोपवला आहे आणि त्यामुळे कथांची वाचनीयता वाढते आणि कथा वाचून संपली तरी दीर्घकाळ वाचकांच्या मनात ती रेंगाळत राहते.
उमाकांत घाटे यांचा जन्म रत्नागिरीचा.
सी. ए. आणि आय. सी. डब्ल्यू. ए. झाल्यानंतर त्यांनी नाशिक व पुणे या दोन शहरांमध्ये काम केले. कामानिमित्त कॉर्पोरेट जगाशी त्यांचा बऱ्यापैकी संबंध आला. भोवतालाविषयी असलेली उत्सुकता व कुतूहल त्यांच्या सर्व कथांमधून प्रत्ययास येते. कुटुंब, समाज, औद्योगिक क्षेत्र यांच्यातील नीतिमत्तेच्या कल्पनांमध्ये कालानुरूप होणारे बदल पारंपरिक संस्कार व आधुनिक काळ यांच्याशी जोडून घेताना वेगवेगळ्या स्तरांवर लोकांना येणारे अनुभव हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. कुटुंबसंस्था व आधुनिक काळामुळे त्या संस्थेत निर्माण झालेले ताणतणाव हेदेखील त्यांनी सूक्ष्म नजरेने टिपले आहेत. प्रत्येक माणसामध्ये चांगल्या आणि वाइटाचे एक मिश्रण असते. हे मिश्रण सतत खदखदत असते. काही वेळा चांगुलपणा बळावतो तर काही वेळा वाईट वृत्ती. दुष्ट आणि सुष्ट वृत्तींमधला हा संघर्ष कथाकार घाटे यांना आकर्षित करून घेतो. धार्मिकतेचे वेगवेगळे आयाम काय असतात किंवा असावेत हादेखील घाटे यांच्या कुतूहलाचा एक विषय. त्या दृष्टीने त्यांची या कथासंग्रहातील जगबुडी ही कथा वाचण्याजोगी आहे. सार्वजनिक विवेक नावाची काही गोष्ट असते का आणि तो आपण गहाण ठेवतो का ? असा प्रश्न ही कथा वाचल्यानंतर मनात उभा राहतो. कुटुंबात मानसिक संतुलन हरपलेली एखादी व्यक्ती असल्यास त्या कुटुंबाचे काय हाल होतात ते घाटे यांनी अत्यंत संवेदनशीलपणे टिपून त्यावर आधारित ‘समाधान’ ही कथा लिहिली आहे. अटळ असणारे वार्द्धक्य स्वीकारणे कसे अवघड आहे किंवा वृद्ध व्यक्तींच्या मनात या संदर्भात काय आंदोलने चाललेली असतात तेही त्यांनी टिपले आहे. भारतात आता हळूहळू ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढते आहे. त्यामुळे समाजजीवनावर वेगवेगळे परिणाम अपेक्षित आहेत.त्याची प्रस्तुत लेखकाने संवेदनशील नोंद घेतली आहे. शिक्षणक्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार व अवनती यांकडे वाचकांचे लक्ष वेधणारी ‘कृपादृष्टी’ ही कथाही अशीच वेगळी आहे.
कथेतील पात्रचित्रण म्हणजे काय याबाबतही विजय तापस सरांनी लिहिले आहे,
‘पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा प्रवाह पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, युक्ती,भावना,विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेलाच आपण पात्र म्हणतो. पात्रांना अस्तित्व देणारा कथाकार असतो हे खरं; मात्र पात्रांना एक स्वायत्तता असते. अनेकदा काही पात्रं ही कथाकाराच्या भाववृत्ती, विचार यांचं प्रतिनिधित्व करणारी असतात. अशा पात्रांना पूर्ण स्वायत्तता नसते.’
घाटे यांच्या या कथासंग्रहातील पात्रांची वर्तणूक या दृष्टिकोनातून पाहणे हा वाचकांच्या दृष्टीने एक अत्यंत सकस अनुभव ठरेल.
हेमंत सरदेसाई यांनी आशयाला साजेल असे मुखपृष्ठ कथासंग्रहाला दिले आहे. घाटे यांचेकडून भविष्यात अशाच आशयघन कथा आपल्याला वाचायला मिळतील याची खात्री वाटते.