हिरवाईनं बहरणाऱ्या ॠतुची चाहूल लागली आता!! पावसाची गाणी गुणगुणणं सुरू झालं, ग्रीष्मातला गुलमोहोराचा बहर, बहाव्याचा पिवळाधम्मक बहर जाऊन आता हिरवागार गारवा अनुभवायला मिळणार, याची वाट पाहणं सुरू झालंय. प्रत्येकाच्या मनात हा पाऊस बरसत असतो; मग तो कोणत्याही स्वरूपात बरसत असेल! कुणाला गावंसं वाटेल, कुणाला चित्र काढावंसं वाटेल, लेखन करावं वाटेल. कुणाच्या मनात कविता उमटतील, कुणाला सुंदर कथा सुचेल; अशा अनेक गोष्टी पावसाच्या ऋतूमुळं घडतात. हा पाऊसच असा असतो, की तो तुमच्या मनातल्या भावनांना वाट करून देतो.
पावसाळा हा ॠतू म्हणजे निर्मितीचा ॠतू होय. कारण नवनिर्मिती या ॠतूत होत असते. नवी पालवी फुटते. माणसाच्या मनातही आनंदनिर्मिती होत असते. श्रावणात अनेकानेक सण येत असतात. त्यामुळे लोकांमधे एकमेकांबद्दलच्या प्रेमाची निर्मितीच होत असते. श्रावणातले सण पाहिले तर ते म्हणजे नैसर्गिक समृद्धीचेच सण आहेत. तेव्हा केले जाणारे पदार्थ, पूजा यांच्याकडे जर नीट अभ्यासपूर्ण पाहिलं तर आपल्याला या गोष्टी जाणवतील!
मराठी साहित्यात तर या पावसाने अगदी बरसात केली आहे. या पावसावर अनेक लेखक-लेखिकांनी ललित लेख लिहिले आहेत, कविता तर अगणित आहेत. इंदिरा संतांची-“नको नको रे पावसा, असा धिंगाणा घालू” ही कविता अजूनही प्रत्येक पावसात आठवते. आजही मोठ्या माणसांच्या मनात देखील “ये रे ये रे पावसा” हे बालगीत म्हटलं जात असतं. मिहाना पब्लिकेशन्सने काही कवितासंग्रह प्रसिद्ध केले आहेत. त्यात या पावसाच्या कविता आहेतच आहेत. कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, बा. भ. बोरकर, बी कवी, वा. रा. कांत, गदिमा, यशवंत यांच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ कवींचे संग्रह तर आहेतच, शिवाय संदीप खरे यांच्यासारख्या आजच्या काळातील कवी-कवयित्री यांचे कवितासंग्रहही आहेत. काळानुसार, ॠतुनुसार होत गेलेले काव्यलेखनातील बदल वाचकांना पाहायला मिळतील. पाऊस ही निसर्गात घडणारी नैसर्गिक घडामोड आहे, पण त्याकडे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन भिन्न आहे, त्यामुळे प्रत्येकात घडून येणारे बदल भिन्न आहेत. याचा एक सुंदर आलेख वाचकांना मिहानाने प्रकाशित केलेल्या साहित्यामुळे पाहायला मिळतो. त्यात कविता आहेत, ललित लेखन आहे, अनुभवकथने आहेत. अशा साऱ्या सकस, दर्जेदार साहित्याने भरलेले असे हे साहित्यदालन आहे.
निसर्गाबरोबरच आमच्या प्रकाशनाने इतरही अनेक विषयांना आपलेसे केले आहे. सध्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे ‘आरोग्य’. आहार, आरोग्य, योग, व्यायाम, वनौषधी, पुष्पौषधी, होमिओपथी अशा विषयांवर असंख्य पुस्तकं आम्ही प्रकाशित केली आहेत. अंजली धडफळे, सरोज भडभडे, रवी जवळगेकर, के. वि. पानसे, राजीव शारंगपाणी, जाई केळकर, श्री. गो. पळसुले अशा या लेखकांनी हे आरोग्य दालन अगदी “आरोग्यपूर्ण” केलं आहे.
जून महिना हा शाळा सुरू होण्याचा महिना; म्हणजे पालकांची, मुलांची नवीन खरेदी करण्याचा महिना. त्यात नवी पुस्तकं, नव्या वह्या खरेदी करण्यात मजा असते. अशा वेळी पालकांनी आपल्या या मुलांना आमच्याकडेही घेऊन यायला हवं. किती प्रकारची मराठी पुस्तकं दर वर्षी निघतात, ते दाखवायला हवं. किती विषयांवर पुस्तकं लिहिली जातात, याचंही ज्ञान त्यांना करून द्यायला हवं. कारण हीच मुलं तर उद्याची आमची लेखकमंडळी असणारेत ना!!
या उद्याच्या लेखकांना घडवण्याचं काम आता आमचं आहे. 77 वर्षांपूर्वी कै. अनंतराव कुलकर्णींनी हे काम मोठ्या जिद्दीने, कष्टाने-मेहनतीने केले होते, तेच काम कै. अनिरुद्ध कुलकर्णींनी पुढे नेले, त्यांनीही काही लेखकांना लिहितं केलं. हीच लिहितं करण्याची परंपरा आम्ही मिहाना पब्लिकेशन्सच्या माध्यमातून अजूनही निष्ठेनं चालवत आहोत, याचं मोठं समाधान आमच्या गाठीशी आहे. हे समाधान तुमच्यासारख्या वाचकांमुळे आणि लेखकांमुळे मिळतं आहे. हा आमचा मोठा गौरवच होय.
–डॉ. अंजली जोशी
संपादक
मिहाना पब्लिकेशन्स
———————————————————————————-
वर्तमानपत्रात एक आशादायक बातमी वाचायला मिळाली. आशादायक ही की, दिवाळी अंकाची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. वाचकांचा उत्तम प्रतिसाद दिवाळी अंकांना मिळाला. वाचून खरंच बरं वाटलं!! हेही वाचून बरं वाटलं की, बहुसंख्य दिवाळी अंक उत्तम लेख, कथा असलेले आहेत. वाचकांनी दिवाळी अंकांना मनापासून पसंती दिली आहे. यामुळे वाचनसंस्कृती वाढीस लागली असं काही लगेच आपण म्हणू शकत नाही. परंतु लोकांना वाचायला अजून आवडतं आहे, हे तर यावरून कळले ना!! ई-बुक ही एक सोय आहे, तो वाचनानंद असू शकत नाही. व्यावसायिक, आरोग्यविषयक, पर्यटनविषयक पुस्तके असतील तर त्यांना ई-बुक हा एक चांगला पर्याय आहे. मात्र कुसुमाग्रजांची विंदांची कविता, गोनिदांची कादंबरी, ना. सं. इनामदारांची राऊ, शिकस्त, अहिल्याबाई होळकरांवरची कादंबरी यांसारखे साहित्य हातात घेऊन वाचल्याखेरीज समाधान होत नाही!! त्या पुस्तकांचं कव्हर, नव्या पुस्तकाचा नवा कोरा वास, कागदाचा स्पर्श या साऱ्या गोष्टी अजूनही हव्याहव्याशा वाटतातच. संदिप खरे यांचे कार्यक्रम हाऊसफुल्ल होतात, तशीच त्यांच्या कवितांची पुस्तकेही आवर्जून वाचली जातात. अग्गोबाई ढग्गोबाई ऐकायला जसं आवडतं तसंच चित्रांसोबतीनं वाचायला पण आवडतं; मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही वाचायला आवडतं. हे सारं आशादायकच आहे ना!! प्रकाशकांना तर उत्साह देणारंच आहे हे सारं!
वाचनसंस्कृतीबाबत अनेकदा निराशेनं, कुत्सितपणे, दयाबुद्धीनं बोललं जातं, लिहिलं जातं, पण संस्कृती ही लोप पावत नाही, तर तीत बदल घडून येतात. त्यामुळे पूर्वीच्या ठोकताळ्यांनी आजच्या वाचनाकडं पाहू लागलो तर कुणालाही चिंताच वाटेल. आजचं माणसाचं जीवन अत्यंत वेगवान झालं आहे. मोबाईल, संगणक यांनी त्याचं जीवन वेढून टाकलं आहे. ते अपरिहार्यही आहे, पण जीवनसंघर्षाच्या रेट्यात माणूस लवकर दमतो आहे. या दमणुकीत त्याला अपेक्षाविरहित साथ देणारी वस्तू नव्हे व्यक्ती कोण तर आनंद देणारं कोणतंही पुस्तकं!! होय, मी मुद्दामच व्यक्ती हा शब्द योजला आहे. कारण कोणत्याही पुस्तकाला एक वैशिष्ट्यपूर्ण असं व्यक्तिमत्त्व असतं. ते त्याच्या कव्हरपासून आपल्याला दिसत असतं. काही काही पुस्तकांच्या केवळ दर्शनानं पण आपण सुखावतो. त्यांच्या वाचनानं तर अधिक सुखावतो, समाधान पावतो. अशा व्यक्तिमत्त्व असलेल्या पुस्तकांमुळं माणसाचं जीवन सुखमय होऊ शकतं, हेच त्याला फार उशिरा समजतं. आजकाल प्रत्येक जण घरी आला की पहिलं टि.व्ही.च्या खोकड्यासमोर बसतो. पूर्वीच्या काळी टि.व्ही.चा हा व्हायरस पसरायचा होता. त्या काळी मोठी माणसं पुस्तकातल्या छान छान गोष्टी मुलांना सांगत असत. चांगली चांगली पुस्तकं वाचायला प्रवृत्त करत असत. यात केवळ घरातली माणसंच नव्हती, तर शाळेतले शिक्षकही मुलांना पुस्तक वाचायला सांगत असत. पुस्तकातलं चांगलं काय असतं याचं ज्ञान करून देत असत. पण आज कुणालाच वेळ नाही, मग प्रश्न पडतो की वेळ नसलेल्या या वेळात माणसं करतात तरी काय? कारण त्या वेळाचा प्रत्येक जण सदुपयोगच करतो असं आपल्याला दिसत नाही. आज असं म्हणायची वेळ आली आहे, की बाबा रे, मराठी नाही तर दुसऱ्या कोणत्याही भाषेतलं वाच पण काहीतरी वाच तरी! अब्दुल कलाम, जयंत नारळीकर यांच्यासारखे लोक का बरं आपल्याला दिसत नाहीत? पुस्तकावर प्रेम करणं म्हणजे स्वत:वर प्रेम करणं होय. पुस्तकातले विचार, कथा, गोष्ट, कविता या माणसाला जगायला शिकवतात, आनंद देतात. त्याला मानसिकदृष्ट्या स्थिर करण्याचं महत्त्वाचं काम ही पुस्तकं करतात, की आजच्या माणसाला त्याची नितांत गरज आहे. आज माणसाचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी संगीतथेरपी सारखी वाचनथेरपी देखील येऊ शकेल. कारण काही काही लेखक असे आहेत, की ज्यांची पुस्तकं वाचली की माणसाला ताजतवानं वाटतं.
अशा या पुस्तकांच्या आवश्यकतेचा महत्त्वाचा दुवा आहे प्रकाशक. कारण त्यांच्यामुळेच आपल्यापर्यंत देखण्या स्वरूपात ही पुस्तकं येत असतात. जुनी पुस्तकं पुन्हा नव्या स्वरूपात आपल्यापर्यंत आणण्यात देखील यांचाच हातभार असतो. चिं. वि. जोशी, ना. सं. इनामदार, कुसुमाग्रज-वि. वा. शिरवाडकर यांच्यासारख्या ज्येष्ठ लोकप्रिय लेखकांची पुस्तके आम्ही नव्यानं वाचक-रसिकांसाठी आणली आहेत. वाचकांनी जरूर आमच्या ग्रंथदालनाला भेट द्यावी!! येणारे नवे वर्ष सर्व रसिक-वाचकांना वाचनसमृद्धीचे जावो, ही सदिच्छा!!
—
डॉ. अंजली जोशी